बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणारा आरोपी दहिवडी पोलिसांच्या जाळ्यात
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड :प्रतिनिधी
माण तालुक्यातील आंधळी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या आरोपीला दहिवडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी कमल तानाजी शेडे (वय ५४, रा. शेंडेमळा, आंधळी, ता. माण) यांच्या फिर्यादीवरून भा.जि.सं. कलम ३३१(३), ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा क्रमांक 198/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ०१ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २२ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ते घरी नसताना, अज्ञात इसमाने त्यांच्या पत्र्याच्या घरातील कनगीत ठेवलेल्या डब्यातून –
मोहनमाळ (किंमत ₹१,४८,०००/-)
कानातील सोन्याची फुले (₹१८,०००/-)
सोन्याच्या दोन नथी (₹१२,०००/-)
रोकड रक्कम ₹६,०००/-
अशी एकूण ₹१,७४,०००/- किमतीचा ऐवज चोरून नेला होता.
या गुन्ह्याचा तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. गोपनीय माहितीवरून आरोपी रामचंद्र भुजब शेंडे (वय ५४, रा. शेंडेमळा, आंधळी) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, त्याच्याकडून सुमारे ३७ ग्रॅम वजनाची ₹१,४८,०००/- किमतीची सोन्याची मोहनमाळ जप्त करण्यात आली.
या कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, पोलीस हवालदार नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, आणि लक्ष्मण कुचेकर यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करत आहेत.