अक्षय तृतीया मुहूर्तावर पंढरपूर मधील कॉरिडॉर बाधितांकडून जागा खरेदीस सुरुवात
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
अदनान कल्याणी
पंढरपूर : प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे शासनाने कॉरिडॉर
करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चौफाळा ते महाद्वार घांटापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असल्यामुळे यांत सुमारे ६०० मालमत्ताधारक बाधित होणार आहेत. यामुळे या मालमत्ताधारकांनी अक्षयतृतीयाचा मुहूर्त साधून जागा बुकिंग व खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला वर्षाला एक कोटीहून अधिक भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाने कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रशासनाला कॉरिडॉर लवकर करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच जागेचे भूसंपादन तीन महिन्यात करावे असे सांगितले होते. यामुळे प्रशासनाने कॉरिडॉर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांची मते जाणून घेण्यासाठी व त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद १ व २ मे रोजी पंढरपुरात बैठक घेणार आहेत. यामुळे कॉरिडॉर होणार हे निश्चित झाले असल्याने निवासासाठी घर हवे म्हणून अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून चौफाळा ते महाद्वार घाट परिसरातील मालमत्ताधारकांनी जागा बुकिंग व खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.. कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना चांगला मोबदला देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामुळे मालमत्ताधारकांमधून आनंद व्यक्त होत असून त्यांनी निवासासाठी नवीन जागेची पाहणी करून बुकिंग व खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.