व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते (कराड प्रतिनिधी ) उंब्रज (ता. कराड) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कराड उत्तर विभागातर्फे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘आवाज कुणाचा – शिवसेनेचा’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर राहो’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
तालुकाप्रमुख मा. संजय भोसले यांनी आपल्या भाषणात हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला व केंद्र सरकारने या घटनेची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. “हा भाग केंद्रशासित असल्याने सुरक्षा व्यवस्था केंद्राच्या अखत्यारीत येते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा,” असे भोसले यांनी ठामपणे सांगितले. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास, जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनाला उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, तालुकाप्रमुख संजय भोसले, उपतालुकाप्रमुख जिवण गायकवाड, रामकृष्ण शिंदे, ज्ञानदेव जाधव, युवासेना जिल्हाधिकारी मिलिंद तोडकर, विक्रम पिसाळ, अमजद मुसांडे, सोमनाथ लोहारक, शंकरराव घार्गे, कोंडीबा गुजले, लक्ष्मण गोंजारे, किरण कदम, संदीप सपकाळ, महेश साबळे, सिद्धांत नलवडे, आदित्य घाडगे, महादेव भोंगाळे, शंकरराव शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.