व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) दहिवडी, ता. माण (जि. सातारा) –
दहिवडी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या श्री सिद्धनाथ देवाच्या रथ मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. या अनुषंगाने डॉ. वैशाली कडुकर, प्रभारी पोलीस अधीक्षक, सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये आदेश काढला आहे.
रथ मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू होऊन रात्री ८ वाजेपर्यंत चालणार आहे. मिरवणूक सिध्दनाथ मंदिरापासून माडी चौक, मायणी चौक, फलटण चौक, एस.टी. स्टँड मार्गे पुन्हा सिध्दनाथ मंदिरापर्यंत होणार आहे. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
मिरवणूक मार्गावरील दहिवडी एस टी स्टॅन्ड ते सिद्धिनाथ मंदिर कॉर्नर अशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, गोंदवले बुद्रुक ते –पिंगळी बुद्रुक चौक मार्गे एस. टी स्टॅन्ड दहिवडी असा पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा आदेश २६ एप्रिल २०२५ रोजी अधिकृतरित्या जारी करण्यात आला असून, सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले आहे .