व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जाकिरा मुल्ला यांचा घवघवित यश – राज्यस्तरीय सन्मान
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
माण, दहिवडी :
शिक्षण क्षेत्रात नवोपक्रम व डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षिकांकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. अशाच उपक्रमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारमळा (भाटकी) येथील मुख्याध्यापिका जाकिरा जावेद मुल्ला यांनी राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत आपली चमक दाखवत इयत्ता ३ री ते ५ वी गटातील परिसर अभ्यास या विषयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल माण तालुक्यातील गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख ₹३,००० चे बक्षीस देऊन दहिवडी येथे गौरविण्यात आले. जाकिरा मुल्ला यांचा हा सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण पवारमळा गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या स्पर्धेचा उद्देश गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनांची स्पष्टता निर्माण करणे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी बनवणे आणि शिक्षकांच्या सर्जनशीलतेला वाव देणे असा होता. जाकिरा मुल्ला यांनी तयार केलेला परिसर अभ्यास विषयावरील व्हिडिओ अभ्यासक्रमाशी सुसंगत, माहितीपूर्ण व विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा असल्यामुळे परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला.
या उल्लेखनीय यशाबद्दल सहाय्यक गटविकास अधिकारी खाडे साहेब, डायट अधिव्याख्याता विजयकुमार कोकरे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे, नंदकुमार दंडीले, केंद्रप्रमुख दिपककुमार पतंगे, नंदकुमार तुपे, महेंद्र हजारे, कदम, विजय गंबरे, वर्षा देवकर, साधना झणझणे, पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सहशिक्षिका अरुणा चोपडे, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या यशामुळे इतर शिक्षकांमध्येही डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची प्रेरणा निर्माण झाली असून, शिक्षण क्षेत्रात जाकिरा मुल्ला यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.