म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : सहा वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना केली अटक
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सचिन मंगरुळे ( प्रतिनिधी )
म्हसवड, ता. ६ एप्रिल —
2019 सालच्या चोरीच्या गुन्ह्यात तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना म्हसवड पोलिसांनी शिताफीने अटक करून न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी केली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पानवण (ता. माण) येथील महेश पबलू चव्हाण आणि रंगनाथ मुरलीधर चव्हाण, दोघेही चव्हाणवाडी, पानवण येथील रहिवासी, यांच्यावर 2019 साली IPC 379 नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल असूनही आरोपी सहा वर्षांपासून न्यायालयात हजर न राहता फरार होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.
पोलिसांनी तांत्रिक माहितीचा आणि गुप्त खबरदारी यंत्रणेचा वापर करून अखेर या दोघांना अटक केली. ही कारवाई अत्यंत गोपनीयतेने आणि काटेकोर नियोजनानुसार करण्यात आली.
ही कामगिरी मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिकाऱ्यांनी केली:
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,भगवान सजगणे,नीता पळे, योगेश सूर्यवंशी, अभिजीत भादुले, युवराज खाडे
या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांतून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.