दहिवडीत पित्यानेच दोन महिन्याच्या मुलाचा विष पाजून खून; जन्मठेपेची शिक्षा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक अहमद मुल्ला )
दहिवडी:

पित्यानेच दोन महिन्याच्या चिमुकल्याला विष पाजून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालय, वडूज यांनी आरोपी रणजीत सुरेश बुलूंगे (वय 33, रा. सुरूर, ता. वाई, जि. सातारा) याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.

ही घटना 20 जानेवारी 2018 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास फुलेनगर, बिदाल (ता. मान, जि. सातारा) येथे घडली. आरोपी रणजीत बुलूंगे याने आपल्या दोन महिन्याच्या मुलास दत्तक देण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी याला तीव्र विरोध केला. या वादातून आरोपीने संतप्त होऊन आपल्या मुलाच्या टॉनिकच्या बाटलीत विषारी औषध मिसळून त्याला पाजले. प्रकृती बिघडल्यानंतर चिमुकल्याला तातडीने सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 21 जानेवारी 2018 रोजी रात्री 9:00 वाजता त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर दहिवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून वैद्यकीय आणि कागदोपत्री पुरावे गोळा केले. दोषारोपपत्र वडूज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले.

खटल्यात सरकार पक्षाने 11 साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे आणि सरकारी वकिलांचा ठोस युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपी रणजीत बुलूंगे याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाच्या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे (दहिवडी पोलीस ठाणे) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाडमधील पो. उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, म. पो. हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. सागर सजगणे, जयवंत शिंदे आणि अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!