उंब्रज पोलिसांची जलद कारवाई: दोन तासांत घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना अटक, ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
श्रीकांत जाधव
कराड
उंब्रज (ता. कराड) – घरफोडी करून लाखोंच्या मालावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना अटक करत अवघ्या दोन तासांत उंब्रज पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. चोरीला गेलेले ६०,००० रुपये किमतीचे टायर हस्तगत करून आरोपींना तुरुंगात धाडण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या जलद व प्रभावी कारवाईचे कौतुक होत आहे.
दिनांक २ मार्च २०२५ च्या रात्री ७.०० वाजल्यापासून ते ३ मार्च २०२५ च्या सकाळी ९.०० वाजेपर्यंत उंब्रज येथील सिद्धीविनायक ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमध्ये चोरी झाली. फिर्यादी गौरव दिपक सुतार (रा. उंब्रज, ता. कराड) हे या गोडाऊनचे मालक असून, गोडाऊनमध्ये एमआरएफ कंपनीच्या भारत बेंझ ट्रकचे टायर साठवले जात होते. चोरट्यांनी लोखंडी छनी व हातोड्याच्या साहाय्याने गोडाऊनचे कुलूप तोडले आणि ६०,००० रुपये किमतीचे चार टायर चोरून नेले.
या घटनेची माहिती मिळताच, उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ११०/२०२५, भारतीय दंड संहितेच्या कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची नोंद होताच, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी पोलीस पथकाला तात्काळ गस्तीचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला.
गस्तीदरम्यान, मौजे उंब्रज (ता. कराड) गावाच्या हद्दीत तीन संशयित इसम पोलिसांना दिसून आले. संशयावरून त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१) रणजित सोमनाथ चव्हाण
२) संकेत संतोष चव्हाण
३) अमोल रमेश चव्हाण
सर्व आरोपी हे लक्ष्मीनगर, उंब्रज (ता. कराड) येथील रहिवासी आहेत.
चौकशीत त्यांनी सिद्धीविनायक ट्रान्सपोर्ट गोडाऊनमधील टायर चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आणि चोरीस गेलेले चारही टायर हस्तगत केले.
ही यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पोलीस हवालदार संजय धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार कोळी, मयूर थोरात, श्रीधर माने आणि प्रशांत पवार यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे उंब्रज पोलिसांचे स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. अवघ्या दोन तासांत चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्याची पोलिसांची कार्यशैली प्रभावी ठरली आहे.