म्हसवडमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक आक्रमक – बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड, ता. ४ फेब्रुवारी:
म्हसवड शहरातील चांदणी चौक पोलीस स्टेशन ते शिक्षक कॉलनी हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची दुरवस्था आणि सातत्याने होणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, याच पार्श्वभूमीवर अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
केवटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देत रस्ता डांबरीकरणाचे त्वरित काम हाती न घेतल्यास दि. २७ फेब्रुवारीपासून उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले आहे.
रस्त्याची दुर्दशा आणि नागरिकांचा संताप
या रस्त्यावरील खड्डे, मुरुमामुळे उडणारी धूळ आणि वाढती वाहतूक यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या असून, अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. वर्षानुवर्षे हा प्रश्न प्रलंबित असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप केवटे यांनी केला आहे.
या निवेदनात “जर २७ फेब्रुवारीपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर मी स्टेज लावून या रस्त्यावरच आमरण उपोषणास बसणार आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि अन्य परिणामांना प्रशासन जबाबदार राहील.” असे स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, म्हसवड नगरपरिषद मुख्याधिकारी आणि म्हसवड पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. आता प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.