व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा, जि. रायगड (प्रतिनिधी: अरुण जंगम)
चार महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर म्हसळा एस.टी. स्थानकातून बस वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. या सेवेला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे म्हसळा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
म्हसळा एस.टी. स्थानक ते नवानगर हा सुमारे एक किलोमीटर अंतराचा काँक्रिट रस्त्याचा पुनर्बांधणी प्रकल्प गेल्या चार महिन्यांपासून सुरू होता. रस्ता अरुंद असल्याने बांधकामास अडथळा येऊ नये म्हणून या कालावधीत एस.टी. वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. परिणामी, म्हसळा बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता, तसेच व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रवाशांनाही पर्यायी वाहतुकीसाठी जादा खर्च करावा लागत होता.
वाहतूक बंद असल्यामुळे तात्पुरते वाहतूक नियंत्रक कक्ष न्यू इंग्लिश स्कूलच्या शेजारी स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा नव्हत्या. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांना शहरात जाण्यासाठी ५० रुपये रिक्षा भाडे मोजावे लागत होते, तर काहींना बायपास (पेट्रोल पंप) येथून प्रवास करावा लागत होता.
दरम्यान, खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून रस्ता बांधकामासाठी तब्बल २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून दोन मार्गिका आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी पक्के गटार बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
४ जानेवारीपासून एस.टी. वाहतूक नियमितपणे सुरू झाल्याने प्रवासी वर्ग आणि व्यापाऱ्यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. म्हसळा बाजारपेठ पुन्हा गजबजलेली दिसत असून, प्रवाशांनी खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि श्रीवर्धन आगार व्यवस्थापक यांचे आभार मानले आहेत.