म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद : नितीन दोशी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड (प्रतिनिधी):

महाराष्ट्रभर वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दिनांक 01 जानेवारी 2025 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत वाचन संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयातही अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

वाचनालयाचे अध्यक्ष आणि म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी वाचन संकल्प अभियानाबाबत माहिती दिली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांच्या सूचनेनुसार या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचनालयात अभियानाच्या निमित्ताने सर्व पुस्तकांची आणि इमारतीची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आले. या प्रदर्शनाला अनेक साहित्यप्रेमींनी हजेरी लावली. वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच वाचकांनी ग्रंथालयाकडे वळावे यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे नितिन भाई दोशी यांनी सांगितले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक प्रशांत सूळ, सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे ग्रंथपाल भारत पिसे, डॉ. दोशी, लोखंडे, विपुल व्होरा यांसारख्या मान्यवरांनी अभियानाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. तसेच, मोफत नगर वाचनालयाचे ग्रंथपाल सुनिल राऊत आणि म्हसवडमधील अनेक सुजाण वाचकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेले हे अभियान वाचकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील वाचकांसाठी वाचनालयाचे दरवाजे खुले आहेत. वाचनसंस्कृती जतन आणि वृद्धिंगत करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प वाचनालयाने केला आहे.

कार्यक्रमाला उपस्थित वाचकांनी वाचनालयाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. वाचन संस्कार घडविण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानांमुळे वाचनालयाच्या महत्त्वाची जाणिव होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!