मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी घोषणा, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पाठपुरावा
मुंबई, . –
महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाशी संबंधित पत्रकारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून, लवकरच राज्याचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेने केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली.
परवा मध्यरात्री मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करत संघटनेच्या विविध मागण्या मांडल्या. ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी, दरमहा ११ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्याची शिफारस मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली आहे. तसेच, राज्यातील युट्यूब चॅनल्स, न्यूज पोर्टल्स, फेसबुक न्यूज पेजेस आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर कार्यरत असलेल्या सर्व डिजिटल पत्रकारांना प्रगतीची संधी देण्यासाठी राज्याचे डिजिटल मिडिया धोरण लवकरच जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने आज अध्यक्ष राजा माने यांनी मंगेश चिवटे यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनंतर, माने यांनी महासंचालनालयाचे संचालक डॉ. राहुल तिडके, हेमराज बागुल, दयानंद कांबळे, गोविंद अहंकारी यांच्याशी चर्चा करत पत्रकारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि गावपातळीवरील सदस्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण धोरणाला चालना मिळाली आहे.