म्हसवड शहरातील वीज वितरणाबाबत नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून विद्युत वितरण कंपनीने या समस्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनद्वारे विधाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन लोहार यांनी केली आहे
अधिक्षक अभियंता विद्युत वितरण कं सातारा यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील काही महिन्यांपासून वीज वितरण कार्यालय म्हसवड शहराच्या बाहेर, माळशिरस चौकात हलवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना कार्यालयात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः वीज समस्या घेऊन कार्यालयात गेल्यानंतर कोणताही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे कामे प्रलंबित राहत आहेत.
शहर अभियंता अधिकाऱ्याच्या बदलीनंतर अनेक दिवस हे पद रिक्त आहे. यामुळे नागरिकांना चुकीची वीज बिले, नवीन कनेक्शनची समस्या व इतर विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या अडचणींमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की, विद्युत वितरण कार्यालय पुन्हा म्हसवड शहराच्या मध्यभागी आणण्यात यावे व शहर अभियंत्याची त्वरित नेमणूक करावी. तसेच, वीज बिले दुरुस्त करण्याची सोय जलद गतीने उपलब्ध करून देण्यात यावी.
विद्युत वितरण कंपनीने या समस्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अध्यक्ष सचिन लोहार यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति अधीक्षक अभियंता दहिवडी, उप अभियंता म्हसवड यांना दिल्या आहेत