दहिवडी पोलिसांची धाडसी कामगिरी: ३ तासांच्या पाठलागानंतर एटीएम चोर पकडले

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

दहिवडी,

३० ऑगस्ट २०२४: रोजी पहाटे २ वाजता दहिवडी शहरातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांचा दहिवडी पोलिसांनी तब्बल ४ किमी पाठलाग करून पर्दाफाश केला. सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करून चोरांना अवघ्या ३ तासांत पकडण्यात यश मिळवले.

सुरुवातीला, चेन्नई आणि माळशिरस येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सुरक्षा अधिकारी यांनी सोनवणे यांना माहिती दिली की, दहिवडीतील एटीएममध्ये काही चोर घुसले आहेत आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिले की, एटीएम यंत्रणा फोडली गेली आहे आणि तेथील कॅमेऱ्यांनाही नुकसान केले आहे.

तपासादरम्यान, पोलिसांनी एटीएम जवळील सीसीटीव्ही फुटेज आणि एटीएममधील छुपे कॅमेरे यांचा वापर करून चोरांचा माग काढला. तपास करत असताना, डॉ. पाटील यांच्या हॉस्पिटलजवळ काही इसम मोटारसायकल सुरू करत असल्याचे दिसले. संशयित हालचालींमुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी एक चोरटा पळून गेला आणि गटारात उडी मारली.

सोनवणे आणि त्यांच्या पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला, तर उरलेल्यांनी मोटारसायकलवर असलेल्या दुसऱ्या चोराला पकडले. पळून गेलेला चोरटा अंधाराचा फायदा घेत टेकडीवर लपून बसला होता, परंतु त्याचा मोबाईल क्रमांक मिळाल्यामुळे सायबर यंत्रणेच्या साहाय्याने त्याचे लोकेशन मिळवून त्यालाही पकडण्यात आले.

पकडलेले आरोपी सागर जगन्नाथ गाडे (वय २३ वर्षे) आणि रणजित राजेंद्र ओंबासे (वय १८ वर्षे) हे दोघेही माण तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी चोरीसाठी विविध साधने आणली होती, ज्यामध्ये छन्नी, हातोडा, लाकडी बांबू आणि पैसे नेण्यासाठी नॉयलॉनची पोती यांचा समावेश होता. त्यांची मोटारसायकल आणि सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पथकातील इतर सदस्यांमध्ये पोलीस हवालदार बापु खांडेकर, तानाजी काळेल, सचिन वावरे, स्वप्नील म्हामणे, निलम रासकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश खाडे आणि विलास हांगे यांचा समावेश आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!