दहिवडी येथील सिद्धनाथ व्यायाम शाळेत तलवार, चाकू, आणि कोयत्याने हल्ला करून आठ जणांना जखमी केल्याप्रकरणी गोंदवले येथील सात जणांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 वाजता, दहिवडीतील सिद्धनाथ मंदिराजवळील व्यायाम शाळेत सोमनाथ लहु चव्हाण आणि त्याचा मित्र दयासागर चंद्रकांत गलंडे व्यायाम करत असताना, गोंदवले येथील लखन पाटोळे, रोहित जाधव, खाशा रणपिसे, गुरुराज माने, प्रसाद माने, चैतन्य माने, आणि किरण माने यांनी त्यांच्या साथीदारांसह या दोघांवर हल्ला चढविला.
दरम्यान, वाद उभा राहिल्यानंतर तेथे आलेल्या राहुल चव्हाण याला तलवारीने पाठीवर मारून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच, इतर हल्लेखोरांनी कोयता, फाईटर, चाकू, लाकडी दांडके, लोखंडी रॉड, आणि लोखंडी पाईप वापरून सैरावैरा हल्ला केला. त्यामुळे सोमनाथ चव्हाण, शुभम जाधव, सुरज चव्हाण, जीवन जाधव, राहुल चव्हाण, दयासागर गलंडे, कुंदन चव्हाण, आणि रामा पाटोळे हे जखमी झाले.
याबाबत सोमनाथ चव्हाण यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गुलाब दोलताडे करीत आहेत.