व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड म्हसवड येथे भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने स्थानिकांमध्ये खळबळ उडवली आहे. घटना स्थळवरून मिळालेली माहिती अशी म्हसवड येथील पोलीस स्टेशन ते शिक्षक कॉलनी रोड वरील माने यांच्या तीनमजली नुकत्याच बांधलेल्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर भाडोत्री राहत असलेल्या मातोश्री मेडिकलचे मालक सागर बबन लाखे यांच्या घरात ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्यांनी २ जूलै च्या दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून त्यांनी कपाटात ठेवलेले तीन तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीचे दागिने चोरून नेले. संध्याकाळी साडे पाच वाजता शेजाऱ्यांनी घराचे कुलूप उघडे असल्याचे पाहून सागर लाखे यांना कळवले. सागर लाखे यांनी मेडिकलमधून घरी येऊन पाहिले असता, घरातील कपाटातील दागिने गायब असल्याचे आढळले.
या घटनेची माहिती मिळताच सागर लाखे यांनी तत्काळ म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनाम्याचे काम सुरू केले.अशीच चोरी दोन ठिकाणी झाली असल्याचे समजते आहे.रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते .
पोलीस या घटनेचा तपास करत असून, चोरट्यांना लवकरच पकडण्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. स्थानिकांनी देखील सतर्क राहून आपापल्या घरांची योग्य प्रकारे सुरक्षा करण्याचे आवाहन सपोनि सखाराम बिराजदार यांनी केले आहे.