विजयकुमार ढालपे
गोदवले -प्रतिनिधी : सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श गाव लोधवडे शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत माण तालुक्यातून द्वितीय क्रमांकासाठी निवड झाली असून, त्यासाठी दोन लाख रुपये रक्कमेचे बक्षीसही मिळणार आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी लोधवडे शाळेतील मुख्याध्यापक दिपक ढोक,सहकारी शिक्षक दिपक कदम, संतराम पवार, सतेशकुमार माळवे, सुचिता माळवे, दीपाली फरांदे व अश्विनी मगर या सर्वच शिक्षकांनी अपार अशी मेहनत घेतली आहे.त्याचा परिपाक म्हणून अगदी अटीतटीच्या चुरशीच्या स्पर्धेत माण तालुक्यातून लोधवडे प्राथमिक शाळेला द्वितीय क्रमांक पटकविण्याचा बहुमान मिळाला आहे. केंद्र ते तालुका स्तरीय मूल्यांकन कमिटीने वेळोवेळी मूल्यांकन करून हा निकाल जाहीर केला आहे.
यशस्वी लोधवडे शाळेतील शिक्षकांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेसाठी माण तालुक्याचे गट विकासाधिकारी मा.प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी मा.लक्ष्मण पिसे,शिक्षण विस्ताराधिकारी मा.रमेश गंबरे , केंद्रप्रमुख नारायण आवळे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि गुरुजन बंधू-भगिनींनी लोधवडे प्राथमिक शाळेचे भरभरून अभिनंदन केले. लोधवडे शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत यशस्वी अशी कामगिरी केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व शिक्षकांना पुष्प गुच्छ देऊन यथोचित असे सन्मानित करून अभिनंदन केले.यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक चोपडे, उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे, सदस्य साहेबराव जाधव, तनुजा जगताप तसेच लक्ष्मण पवार,शिवाजी मोरे व पोपट जाधव आदि मान्यवर मंडळीही लोधवडे गुरुजनांच्या या सत्कार प्रसंगी उपस्थित होती.