कर्मवीर जयंती १३६ वी कर्मवीरांनी शिक्षण गरीबांच्या झोपडीपर्यंत पोहचवलेः प्रभाकर देशमुख
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड –
रयत शिक्षण संस्था ही खऱ्या अर्थाने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर आण्णांनी निर्माण करून ज्ञानाची गंगा गरीबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवली, असे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती सोहळा देवापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स व ठक्कर बाप्पा वसतिगृह येथील प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रभाकर देशमुख बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्राचार्य बी एस खाडे, प्रमुख वक्ते दादाराम साळुंखे होते तर प्राचार्य टी एस माने, पर्यवेक्षक डि एल चिंचकर,सरपंच शहाजी बाबर, डॉ विकास बाबर, प्रा.विश्वंभर बाबर, रावसाहेब बाबर, उध्दव बाबर, राजाराम बाबर, किरण बाबर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले, जगातील शिक्षण व्यवस्थेतील बदलाला आपली शिक्षण व्यवस्था टिकण्यासाठी कार्यक्षम बनवली पाहिजे. तसेच
कर्मवीर अण्णांचे रयतेचे संस्कार विद्यार्थ्यांना शिकवावेत कर्मवीर अण्णांचे विचार शेवटच्या विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे मुलांचे शिक्षण हिच खरी गुंतवणुक आहे मुलांसाठी पालकांनी वेळ दिला पाहिजे. विद्यार्थ्यानी कष्ट करण्याची तयारी ठेवा जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही असेही शेवटी सांगितले.

यावेळी प्रा.बी एस खाडे यांनी डॉ .कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संपूर्ण जीवन आणि कार्य यांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी आधुनिक युगामध्ये
आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणे तसेच संशोधक वृत्तीने नवीन काहीतरी करून दाखवण्याची धमक महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख वक्ते दादाराम साळुंखे म्हणाले जगात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर गुरु आहे शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहा. कमवा शिका योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात ज्ञान गंगा पोहचली व सर्वसामान्यांची मुले शिकून मोठ्या हुद्द्यावर पोहचली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी मनोगत, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थिताचे आभार प्रा. बी एन पाटील यांनी मानले.