विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंगणीच्या चौघांवर गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेतलेल्या विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंगणी ता. माण येथील तिच्या पतीसह चौघांविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पतीसह सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. पती सिद्धनाथ अंकुश घुटुकडे ( वय २९), सासरा अंकुश जगु घुटुकडे (वय ५५), सासू अनुसया अंकुश घुटुकडे,व दीर बंडू अंकुश घटुकडे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मृत विवाहिता स्वप्नाली हिचे वडील देवीदास भागोजी मासाळ (वय ४९, रा. धुळदेव, ता. माण) यांनी फिर्याद दिली. १९ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर स्वप्नालीचा शेतात काम करण्याच्या कारणावरून पती, सासू, सासरे व दीर हे शिवीगाळ, मारहाण करून उपाशी ठेवून छळ करत होते. छळास कंटान तिने पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात भाजल्यानंतर तिच्यावर उपचार करून बरी झाल्यानंतर तिला म्हसवड येथे भाड्याच्या खोलीत ठेवण्यात आले होते. तेथे तिला भेटण्यासाठी तिचा पती येत होता. तू पेटवून घेतले आहेस, त्याचा दवाखान्याचा खर्च तुझा बाप देणार का?, तुझ्यामुळे शेतातील ऊस जळाला, आमचे शेतातील नुकसान झाले. तू पेटवून घेतले आहेस तू आता चांगली दिसत नाहीस, तुझा काही उपयोग नाही. मी दुसरे लग्न करणार आहे, असे सांगून तिला मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि भुजबळ करत आहेत