म्हसवड येथील वृक्षप्रेमी अवलिया पोलीस अधिकारी
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी.
कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जपणूक करून , प्रचंड कामाच्या व्यापातून वृक्ष संवर्धन करणाऱ्या अवलिया पोलीस अधिकाऱ्याचे दर्शन नुकतेच म्हसवड पोलीस स्टेशनच्या परिसरात दिसून आले.
राज्य पोलीस दलात भिन्न गुणधर्माचे अनेक पोलीस अधिकारी विविध स्तरावर कार्यरत आहेत.मी आणि माझी ड्युटी हे अनेकांचे घोषवाक्य असते. आपल्या शासकीय सेवे बरोबरच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन करणाऱ्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे दर्शन काल रात्री आठच्या दरम्यान दिसून आले. हे अधिकारी सदर वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असणाऱ्या झाडांना पद, प्रतिष्ठा, बाजूला ठेवून चक्क हातात पाण्याची पाईप घेऊन झाडाला पाणी घालत होते.या वृक्षप्रेमी अवलिया पोलीस अधिकाऱ्याचे नाव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ होय. झाडांना पाणी देताना पाण्याची पाईप ओढण्यासाठी त्यांना मदत करीत होते पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे. सदर वैशिष्ट्यपूर्ण बाब रात्रीच्या वेळी गावातून शिक्षक कॉलनी कडे जाणारे चाणाक्ष व्यक्तिमत्व वनश्री पुरस्कार तसेच कृषी रत्न पुरस्कार विजेत्या प्रा विश्वंभर बाबर यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांचीही पत्रकारिता जागी झाली.त्यांनी रस्त्या वाकडा करून पोलीस स्टेशन आवारात छुप्या पद्धतीने प्रवेश करून नाविन्यपूर्णरित्या वृक्षसंवर्धन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची झाडांना पाणी घालतानाची छबी आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये नकळतपणे टिपली.
खरे तर आपल्या सेवा कालावधीमध्ये केवळ पाट्या टाकणारे, . दिवसा पाठीमागून दिवस ढकलणारे, केवळ आपला स्वार्थ आणि स्वार्थ पाहणारे, अनेक अधिकारी कर्मचारी व मान्यवर आपल्याला पाहावयास मिळतात.
मात्र दुसऱ्या बाजूला प्रचंड कामाच्या व्यापातून वेळ काढून,खरेतर हाताखाली दोन डझन पेक्षा जास्त कर्मचारी असताना,याशिवाय म्हटलं तर चार दोन रोजंदारी कामगार लावण्याचा अधिकार असताना हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मी आणि माझं दर्जेदार पोलीस स्टेशन म्हणून चक्क रात्रीच्या वेळी झाडाला पाणी घालताना दिसून आले .या पोलीस अधिकाऱ्याने अल्प कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवून तसेच छोटी छोटी कामे करून म्हसवड पोलीस स्टेशनचा कायापालट केलेला दिसून येत आहे . व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांमध्ये दृष्टिकोन असावा लागतो.विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये लघुकोन, काटकोन, त्रिकोण या बद्दल शिकवले जाते मात्र दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा कोण कोणत्याही पुस्तकाच्या माध्यमातून शिकवला जात नाही. तो स्वतःच्या हृदयातच असावा लागतो.आणि हा दृष्टिकोन म्हसवड पोलीस स्टेशनच्या
पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांनी नुकताच दाखवून दिला आहे.अशा या वृक्षप्रेमी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सलाम. देश आपल्यासाठी काय करतोय त्यापेक्षा आपण निसर्गाच्या संतुलनासाठी व देशासाठी काय करतोय हे महत्त्वाचे असून त्याबाबतचा दृष्टिकोन म्हसवड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे .त्यांच्या कार्याला शतशा प्रणाम . सध्या बदलत्या परिस्थितीत सतत वाढणारे उच्च तापमान, त्याचा मनुष्य जीवनावर होणारा अनिष्ट परिणाम, आणि त्यावर करावयाची उपायोजना याचा सारासार विचार केल्यास निसर्गाचा समतोल राखण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याप्रमाणे निसर्ग संतुलन साठी प्रत्येक नागरिकांनी खारीचा वाटा उचलावा हीच माफक अपेक्षा आहे.