संत नामदेव महाराजांच्या ७५६ व्या जयंतीचा सातारा जिल्ह्यात उत्साहात जागर करा! इंजि. सुनील पोरे 

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज
सातारा : प्रतिनिधी
संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५६ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि समाजाच्या एकजुटीने साजरा करण्यात यावा, असे जाहीर आवाहन नामदेव समाजोन्नती परिषद, सातारा जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी केले आहे. शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी हा जयंती सोहळा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भव्य स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांनी आपल्या अभंगवाणी, कीर्तन आणि भक्तीपर रचनांमधून समाजाला भक्ती, समता, बंधुता, प्रेम, मानवता आणि सामाजिक एकात्मतेचा अमूल्य संदेश दिला. त्यांनी आपल्या विचारांतून जातिभेद, उच्च-नीचतेच्या भावना बाजूला ठेवून माणुसकीला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या अभंगांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील भक्ती चळवळीला नवी दिशा दिली. त्यामुळे संत नामदेव महाराजांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक समाज बांधवाची जबाबदारी असल्याचे इंजि. पोरे यांनी नमूद केले.

या जयंतीचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहरात संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक, भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, पालखी व मिरवणूक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सामाजिक प्रबोधन, गरजूंना मदत आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून जयंती उत्सवाला विधायक स्वरूप द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

समाजाची एकजूट आणि संघटन हीच काळाची गरज!

आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत समाजाने एकत्र येऊन संघटन मजबूत करणे, युवकांना समाजकार्यात सहभागी करून घेणे, महिला मंडळांना प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. संत नामदेव महाराजांच्या विचारांचा जागर करताना त्यांच्या शिकवणुकीनुसार समाजात प्रेम, सलोखा आणि बंधुभाव वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व नामदेव समाज बांधव, महिला मंडळे, युवक मंडळे, ग्रामस्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी तसेच समाजातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागात जयंती उत्सवाचे नियोजन करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रत्येक गावात संत नामदेव महाराजांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे आणि संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले पाहिजे, अशी अपेक्षा नामदेव समाजोन्नती परिषद, सातारा जिल्हा शाखेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

“आपला समाज, आपली एकजूट आणि आपला संत वारसा” या भावनेतून सर्वांनी एकत्र येत संत नामदेव महाराजांची ७५६ वी जयंती ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि समाजप्रबोधनाचा आदर्श ठरेल अशा पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी केले आहे.

या आवाहनावर जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे, सरचिटणीस श्री. श्रीकांत फुटाणे आणि नामदेव समाजोन्नती परिषद, सातारा जिल्हा शाखेच्या समस्त जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने समाज बांधवांना जयंती उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *