पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात हर्षदा देशमुख-जाधव यांचा ऐतिहासिक ठसा!
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
राजकारणात महिलांचे नेतृत्व अधिक सक्षमपणे पुढे येत असल्याचे अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण विजय पुणे पदवीधर मतदारसंघात नोंदवला गेला आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी पहिल्याच निवडणुकीत बाजी मारत विधान परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या विजयामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाला पहिली महिला आमदार मिळण्याचा ऐतिहासिक मान प्राप्त झाला आहे.
या विजयाने केवळ एका उमेदवाराचे राजकीय यश अधोरेखित केले नसून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्येही नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांशी असलेले त्यांचे कौटुंबिक, शैक्षणिक आणि सामाजिक संबंध या निवडणुकीत महत्त्वाचे ठरल्याचे मानले जात आहे.
हर्षदा देशमुख-जाधव या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. प्रभाकर देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निकटचा राजकीय संबंध राहिला आहे. २०१९ मध्ये त्यांनी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात झालेल्या अटीतटीच्या लढतीत त्यांना ८८ हजार ४२६ मते मिळाली होती. मात्र, अत्यल्प मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
वडिलांच्या राजकीय प्रवासातील अपूर्ण राहिलेली संधी आता कन्या हर्षदा यांनी आपल्या विजयातून गाठली आहे. मात्र, हा विजय केवळ राजकीय वारशाच्या जोरावर मिळालेला नसून उच्च शिक्षण, व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव आणि पदवीधरांच्या प्रश्नांवरील सक्रिय भूमिकेचीही त्याला जोड असल्याचे चित्र आहे.
हर्षदा देशमुख-जाधव यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उल्लेखनीय आहे. पुण्यातील व्हीआयटी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एम.ई.चे शिक्षण पूर्ण केले. ब्रिटनमधील क्रॅनफिल्ड विद्यापीठातून फायनान्स अँड मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच पुण्यातील के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी ग्रुपमध्ये त्यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांच्या जीवनप्रवासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांशी असलेली जवळीक. पंढरपूर येथे जन्म, सांगलीतील आजोळ, कोल्हापुरातील शिक्षण, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील लोधवडे या गावाशी माहेरचे नाते आणि पुणे हे सासर अशी त्यांची व्यापक भौगोलिक व सामाजिक ओळख आहे.
उच्चशिक्षण, प्रशासकीय अनुभवाचा वारसा, व्यवस्थापन क्षेत्रातील काम आणि राजकीय-सामाजिक संपर्क या सर्व बाबींचा त्यांच्या निवडणूक प्रवासाला फायदा झाला. विशेषतः पदवीधर मतदारांच्या अपेक्षा आणि प्रश्न मांडण्याच्या भूमिकेमुळे त्यांना मतदारांचा विश्वास संपादन करता आला.
हर्षदा देशमुख-जाधव यांच्या या विजयामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले आहे. पहिल्याच निवडणुकीत मिळवलेले यश आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

