नांदेडमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारो अनुयायांच्या उपस्थितीत झाला महावंदना समारंभ संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज
नांदेड / अर्धापूर :- (उध्दव सरोदे )
बोधिसत्त्व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सम्राट अशोक विजयादशमी दिनी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडकरांच्या वतीने रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य महावंदना समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ६ वाजता पूज्यनीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली हजारो उपासक-उपासिकांच्या सहभागात हा समारंभ अत्यंत श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या महावंदना समारंभाचे हे सलग ४ थे वर्ष असल्याचे आयोजकांनी नमूद केले.तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती राजा सम्राट अशोक आणि बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.पूज्यनीय भिक्खू विनय बोधिप्रिय महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील ग्रहण करून प्रदान केले.भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसर बुद्धवंदनेने निनादून गेला आणि महावंदना श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाली.
महा वंदने नंतर पूज्यनीय भिक्खू विनयप्रिय बोधी महाथेरो यांनी समयोचित प्रवचन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यामागील भूमिका,त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे ध्येय आणि धर्मांतराच्या ऐतिहासिक प्रसंगी जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद त्यांनी प्रभावी शब्दांत मांडला. त्यांच्या हृदयस्पर्शी प्रवचनाने उपस्थित उपासक-उपासिका भावविवश झाले.
या मोठ्या आणि महत्त्वाच्या आयोजनाच्या यशात तरूणांचे मोलाचे योगदान महाविहार बावरीनगर दाभड ता. अर्धापूर (नांदेड) येथील भिक्खू बुद्धभूषण यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आंबेडकरी तरूणांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले.तरूणांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.या सहकार्याबद्दल भिक्खू विनयप्रिय बोधी महाथेरो यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी पूज्यनीय भिक्खू विनयप्रिय बोधी महाथेरो,भिक्खू पय्यारत्न महाथेरो,भिक्खू बुद्धभूषण,भिक्खुणी चारूशीला आणि श्रामणेर संघ यांची प्रमुख उपस्थिती होती.शहरातील अनेक प्रतिष्ठित उपासक-उपासिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून महावंदनेत सहभाग घेतला.समता बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित हा महावंदना समारंभ केवळ धम्मविधीपुरता मर्यादित न राहता भगवान बुद्धांचा करूणा,मैत्री आणि प्रज्ञेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, स्वातंत्र्य,बंधुता आणि सामाजिक न्यायाचे विचार समाजापर्यंत पोहोचवणारा ठरला.उपस्थितांच्या अनुमोदनाने या कार्यक्रमाची नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या सांगता झाली.

