म्हसवड पालिकेचा कारभार मनमानीने सुरू?; किशोर सोनवणेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड नगर परिषदेचा कारभार कायद्यानुसार आणि पारदर्शक पद्धतीने चालविण्याऐवजी मनमानी पद्धतीने आणि स्वार्थासाठी सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केला आहे. नगरपालिकेच्या विविध कामांमध्ये पारदर्शकता आहे का, नागरिकांच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
म्हसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेस इंजिनिअर अरविंद पिसे, जयराज राजेमाने,दिपसिह राजेमाने, कांता ढाले परेशशेठ व्होरा, ॲड. कु. सोनवणे शंकर इंगळे,शांतीलाल सरतापे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोर सोनवणे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते दोन पुरस्कार प्राप्त झालेले माजी सनदी अधिकारी व त्यांचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड नगर परिषदेकडून सुरू असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तब्बल ७९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची शोधपत्रिका न काढणे तसेच सरकारी पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या आरोपांवरून संबंधित मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
याच मागण्यांसह एकूण ११ मागण्यांसाठी सोनवणे यांनी दोन दिवस नगरपालिकेसमोर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनादरम्यान म्हसवड नगरपालिकेतील कथित भोंगळ कारभारावर त्यांनी सत्ताधारी गट आणि प्रशासनाला लक्ष्य केले होते.
पाणीपुरवठा योजना, रस्ते दुरुस्ती, वाळू चोरी, बांधकाम परवाने, पालिकेची मालमत्ता विक्री तसेच विविध विकासकामे याबाबत त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या कामांमध्ये पारदर्शकता आहे का? नागरिकांच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का? नागरिकांच्या तक्रारींची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जाते का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
पाणीपुरवठा योजनेतील कामे, शहरातील रस्त्यांची दुरवस्था, ठेकेदारांकडून करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने जनतेला जाब द्यावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली.
पत्रकार परिषदेत उपलब्ध कागदपत्रे, छायाचित्रे आणि अन्य पुरावे सादर करत संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. आपल्या आरोपांमध्ये तथ्य नसेल तर प्रशासनाने वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी; मात्र आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका सोनवणे यांनी मांडली.
किशोर सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या गंभीर आरोपांमुळे म्हसवडच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता या आरोपांवर मुख्याधिकारी आणि सत्ताधारी गट काय स्पष्टीकरण देणार? प्रशासनाकडून चौकशी अथवा कारवाई केली जाणार का? याकडे म्हसवडकरांचे लक्ष लागले आहे.

