शासकीय जमीन हडपण्याचा डाव उधळला! तारळी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर बनावट आदेश; मुख्य आरोपी दिपक कदम अटकेत
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
तारळी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय कार्यालयांची फसवणूक करत शासकीय जमीन स्वतःच्या ताब्यात घेऊन तिची खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणात म्हसवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिपक प्रकाश कदम (रा. जांभे, ता. जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार ११ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सहीची बनावट डिजिटल स्वाक्षरी तयार करणे, बनावट शिक्के तयार करून त्यांचा खऱ्या दस्तऐवजाप्रमाणे वापर करणे तसेच शासकीय कार्यालयांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, उपविभागीय अधिकारी कराड यांच्या कार्यालयाने निर्गमित न केलेला क्र./पुनर्व./तारळी/जांभे/एसआर-६/२०२६ दिनांक २४ मार्च २०२६ हा कथित बनावट आदेश तयार करण्यात आला. हा आदेश खरा असल्याचे भासवून ग्राम महसूल अधिकारी, पानवण यांच्याकडे नोंदविण्यात आला. त्यानंतर मंडल अधिकारी वरकुटे-मलवडी यांच्याकडून फेरफार क्रमांक ३६१९ मंजूर करून घेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या फेरफाराच्या आधारे मौजे पानवण येथील गट क्रमांक ७७१ मधील तब्बल २.४० हेक्टर शासकीय जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवून सातबारा उताऱ्यावर नावे नोंदविण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. एवढ्यावर न थांबता या बनावट आदेशाच्या आधारे सह दुय्यम निबंधक, फलटण क्र. २ यांच्या कार्यालयात दस्त नोंदवून शासकीय जमिनीची खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी विश्वजीतसिंह राजारामसिंह राजपूत, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, कराड यांनी तक्रार दिली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी मारुती भैरू कदम, अविनाश गोविंद कदम, प्रकाश मारुती सपकाळ, रामू भगवान कुटे आणि संजय किसन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी दिपक प्रकाश कदम याला अटक केली.
दिपक कदम याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे या बनावट दस्तऐवज प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, बनावट आदेश व डिजिटल स्वाक्षरी कोणी तयार केली आणि शासकीय जमीन व्यवहारामागे नेमका कोणाचा उद्देश होता, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण तसेच पोलीस अंमलदार अमर नारनवर, प्रकाश इंदलकर, नवनाथ शिरकुळे आणि अनिल वाघमोडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

