दृष्टीहीनता थांबवू शकत नाही स्वप्नांची भरारी! आधारिका फाउंडेशन आणि कला संजीवन फाउंडेशनच्या अंध गोविंदांचा मुंबईत थरार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

विनायक मोरे
मुंबई : प्रतिनिधी
डोळ्यांना दिसत नसले तरी स्वप्नांना दिशा आणि जिद्दीला बळ असेल, तर कोणतेही आव्हान अशक्य नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी आधारिका फाउंडेशन प्रायोजित आणि कला संजीवन फाउंडेशन संचलित दिव्यांग (अंध) गोविंदा पथक सज्ज झाले आहे. दहीहंडीच्या उत्साहात हे अंध गोविंदा यंदाही मुंबईकरांना आपल्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा थरार अनुभवायला देणार आहेत.

“अंधत्व किंवा कोणतेही अपंगत्व माणसाला त्याची स्वप्ने साकार करण्यापासून रोखू शकत नाही,” हा संदेश घेऊन हे गोविंदा दहीहंडीच्या मैदानात उतरतात. २०१८ मध्ये स्थापन झालेल्या कला संजीवन फाउंडेशनने गेल्या नऊ वर्षांपासून दहीहंडी उत्सवात अंध गोविंदांना व्यासपीठ उपलब्ध करून देत वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आधारिका फाउंडेशनही अशा अंध गोविंदा पथकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. यंदाचे वर्ष या दोन्ही संस्थांच्या भागीदारीचे पहिले वर्ष ठरले आहे.

विशेष म्हणजे, दिव्यांगांना केवळ सणापुरती मदत न करता त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आधारिका फाउंडेशनने गेल्या सहा महिन्यांपासून कांदिवली येथे अंध व्यक्तींना टेलिकॉलर म्हणून रोजगार देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रायोगिक उपक्रम सुरू केला आहे.

या गोविंदा पथकात ४० ते ५० पूर्णतः किंवा अंशतः अंध तरुणांचा सहभाग आहे. कर्जत, कसारा, बदलापूर, वांगणी, विरार यांसह मुंबई आणि ठाणे परिसरातील विविध भागांतून हे तरुण एकत्र येतात. हंडी फोडण्याबरोबरच समाजाची दिव्यांगांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचा संदेश देणे, हेच या पथकाचे खरे उद्दिष्ट आहे.

पथकातील बहुतांश गोविंदा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्यांनी ज्युडो, क्रिकेट, कबड्डी यांसारख्या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. क्रीडाक्षेत्रातून मिळालेला आत्मविश्वास आणि जिद्द आता दहीहंडीच्या मैदानातही दिसून येत आहे.

माटुंगा येथील पोदार कॉलेजजवळील दडकर मैदानावर दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चार ते सात या वेळेत या गोविंदांचा सराव सुरू असतो. एकमेकांच्या स्पर्शावर, विश्वासावर आणि जिद्दीवर अवलंबून एकावर एक थर रचताना या गोविंदांचा आत्मविश्वास पाहणाऱ्यांना अक्षरशः थक्क करून सोडतो. गेल्या वर्षी ‘ग्रो गोविंदा’मध्ये या पथकाने सुरक्षितपणे चार थरांचा पिरॅमिड रचत आपल्या क्षमतेची झलक दाखवली होती.

यंदाही कठोर सरावाच्या जोरावर सुरक्षितपणे चार थरांचा पिरॅमिड रचण्याचा निर्धार या गोविंदा पथकाने केला आहे. चरणी रोड ते बोरिवलीदरम्यान विविध दहीहंडी मंडळांना भेटी देत हे गोविंदा आपल्या कौशल्याचे दर्शन घडविणार आहेत.

डोळ्यांना दिसत नसले तरी ध्येय मात्र स्पष्ट आहे… म्हणूनच या अंध गोविंदांची प्रत्येक थरावरची भरारी ही केवळ दहीहंडीची कसरत नसून, जिद्द, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची प्रेरणादायी यशोगाथा ठरत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *