म्हसवड नगरपालिकेसमोर किशोर सोनवणे यांचे उपोषण सुरू विविध विकासकामांतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, : प्रतिनिधी
म्हसवड नगरपरिषदेच्या कारभारातील कथित अनियमितता, वाढीव पाणीपुरवठा योजनेतील कामकाज तसेच विविध विकासकामांबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर भोजलिंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात झाली असून या आंदोलनाला विविध नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
म्हसवड नगरपरिषदेच्या सुमारे ७९ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाबाबत पारदर्शकता ठेवावी, तसेच या योजनेतील कामांची कागदपत्रे, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष झालेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी किशोर सोनवणे यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या विविध रस्ते व विकासकामांमध्ये नियमांचे पालन झाले आहे का, कामांचा दर्जा योग्य आहे का आणि शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामात वारंवार गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा आरोप करत याला जबाबदार कोण, याची चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे, बांधकाम परवानग्यांपेक्षा अधिक झालेले बांधकाम, घरपट्टी नोंदणी तसेच नगरपरिषदेचे संभाव्य आर्थिक नुकसान या विषयांवरही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एप्रिल व मे महिन्यात टँकरद्वारे करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या खर्चाची तपशीलवार माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी, रस्ते खोदकामानंतर ते पूर्ववत न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची चौकशी करावी, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
या उपोषणाला कविताताई म्हैत्रे, तेजसिंह राजेमाने, संजय माने-पाटील, सचिन लोखंडे, रोहित सोनवणे, संभाजी लोखंडे, शांतीलाल सरतापे, भैय्या टाकणे, कांता ढाले, कासलिंग रुपनवर, मोतीलाल खंदारे, दीपक खंदारे, संतोष सोनवणे, बापू सदाफुले, प्रकाश लोखंडे, उत्तम होटकर आणि रंजीत लोखंडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले आहेत.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
म्हसवड शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, विकासकामे, बांधकामे आणि नगरपरिषदेच्या निधीशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका किशोर सोनवणे व सहभागी आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणती भूमिका घेतात, याकडे म्हसवड शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

