स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांची विशेष नाकाबंदी; ५३ वाहनांवर कारवाई, ३४,५०० रुपयांचा दंड
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सपोनि संदिप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.
या विशेष नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. तपासणीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ५३ वाहनचालकांविरुद्ध केसेस दाखल करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या काळात शहरात तसेच ग्रामीण भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने ही विशेष कारवाई करण्यात आली.
म्हसवड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच धडा मिळाला असून, वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपा, असे आवाहन सपोनि संदिप पोमन यांनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांनी राबविलेल्या या विशेष नाकाबंदीमुळे शहरातील वाहतूक शिस्तीला हातभार लागला असून, आगामी काळातही नियमभंग करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

