पर्यंतीत तीन पानी जुगारावर म्हसवड पोलिसांची कारवाई; २.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, दि.१७ : प्रतिनिधी
पर्यंती (ता. माण) गावच्या हद्दीत लक्ष्मीदेवी मंदिराच्या आडोशाला सुरू असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सात जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, दोन दुचाकी व सहा मोबाईलसह एकूण २ लाख १३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पर्यंती गावच्या हद्दीत लक्ष्मीदेवी मंदिराच्या आडोशाला काही जण तीन पानी पत्त्यांवर पैशांची पैज लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून प्रशांत अशोक झेंडे (वय ३६, रा. इंजबाव, ता. माण), पैंगबर ताजुद्दीन मुल्ला (वय ५२), बाजीराव रामा नरळे (वय ४२), दादा पांडुरंग नरळे (वय ३८), सुभाष लक्ष्मण काळेल (वय ५०), गिताराम मारुती शिंदे (वय २८, सर्व रा. पर्यंती, ता. माण) आणि उमेश नारायण गुरव (वय ५२, रा. शंभुखेड, ता. माण) यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत ३ हजार २८० रुपये रोख, दोन दुचाकी, सहा मोबाईल हँडसेट तसेच पत्त्यांची एक कॅट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख १३ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, तपासी अंमलदार आर. के. फडतरे पुढील तपास करीत आहेत. संबंधित सातही जणांना BNSS कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.

