माणदेश न्यूज’चे संपादक विजय टाकणे यांना प्रतिष्ठेचा ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी 

     ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सातत्याने मांडत निर्भीड, निःपक्ष आणि जनहिताची पत्रकारिता करणारे ‘माणदेश न्यूज’चे संपादक विजय रंगनाथ टाकणे यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेची दखल घेण्यात आली असून, त्यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेमुळे म्हसवडसह संपूर्ण माणदेश परिसरातील पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून आनंद व्यक्त होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आयार्यवी एंटरटेनमेंट’च्या वतीने आयोजित पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६ अंतर्गत विजय टाकणे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठविणे तसेच माणदेशातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विकासात्मक घडामोडींना व्यापक प्रसिद्धी देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

      विजय टाकणे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे. ‘दैनिक माणदेश’ आणि ‘माणदेश न्यूज’च्या माध्यमातून त्यांनी माणदेशातील ग्रामीण जनजीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. दुष्काळी भागातील पाणीप्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या, सामाजिक अन्याय, प्रशासनातील त्रुटी, शिक्षण, आरोग्य, शेती, संस्कृती आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषय त्यांनी सातत्याने पत्रकारितेच्या केंद्रस्थानी आणले.

     विशेषतः ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्नांना प्रसिद्धी देत संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचे काम त्यांनी केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या प्रसिद्ध करण्याचे माध्यम नसून समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे, या भूमिकेतून त्यांनी आपली पत्रकारिता कायम ठेवली. निःपक्षपाती भूमिका, निर्भीड लेखन आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी माणदेशातील पत्रकारितेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

    स्थानिक प्रश्नांपासून व्यापक सामाजिक विषयांपर्यंत विविध घडामोडींचा सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी ग्रामीण पत्रकारितेला बळ दिले आहे. समाजातील चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी देतानाच अन्याय, गैरप्रकार आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर स्पष्टपणे भाष्य करण्याची भूमिका त्यांनी जपली आहे. त्यांच्या या पत्रकारितेची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून, अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आता प्रतिष्ठेचा ‘शब्दवेध गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

       या पुरस्काराची घोषणा होताच पत्रकार, संपादक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, मित्रपरिवार तसेच म्हसवड आणि माणदेश परिसरातील नागरिकांनी विजय टाकणे यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण पत्रकारितेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकाराचा होत असलेला हा गौरव संपूर्ण माणदेशासाठी अभिमानाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतून व्यक्त होत आहेत.

      पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरेंद्र गावंडकर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यात पत्रकारिता, कला, साहित्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *