सिद्धनाथ दर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; तांदूळवाडीजवळ पिकअप विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू, ७ जण बचावले
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड/तांदूळवाडी, प्रतिनिधी :
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांवर रविवारी काळाने घाला घातला. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात त्यांची पिकअप (टमटम) गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत लहान मुले व महिलांसह ८ जणांचा मृत्यू झाला असून ७ जणांना जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर–म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी येथे आल्यानंतर वाहनात बिघाड झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट विहिरीत कोसळली. अपघातावेळी वाहनात एकूण १५ भाविक प्रवास करत होते. सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेत सिद्धेश्वर पोपट जाधव, चालक सागर चौगुले, अपूर्व अमोल सातोरे, आरव अमोल सातोरे, बालाजी बावचे, शशिकला पोपट जाधव आणि संदीप बावचे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर पूजा अमोल सातोरे, ताई बावचे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, सार्थक संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, गणेश बालाजी बावचे तसेच बालाजी बावचे यांचा लहान मुलगा यांचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनास्थळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तहसीलदार सचिन लंगुटे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तांदूळवाडी परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात होत असल्याचा दावा केला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव असून, विहिरींना संरक्षक कठडे नसल्याने गंभीर धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ही दुर्घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली असून सिद्धनाथ दर्शनाचा आनंद क्षणात शोकांतिकेत बदलल्याने रांजणी गावावर दुःखाची छाया पसरली आहे.

