दहिवडी पोलिसांची अवैध दारूविक्रीवर आणखी एक मोठी कारवाई; आठवड्यातील चौथी रेड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी :प्रतिनिधी

दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्रीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या आठवड्यातील ही चौथी धडक रेड असून, पोलिसांनी तब्बल २ लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दि. १९ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दहिवडी-गोंदवले रोडवरील स्वाती मंगल कार्यालयासमोर पांढऱ्या रंगाच्या मारुती ओमनी (MH12 NU 8943) वाहनावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत प्रकाश बाबुराव घोडके (वय ५२, रा. गोंदवले ता. माण जि. सातारा) याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

जप्त मुद्देमालामध्ये इम्पेरियल ब्लू, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल्स, किंगफिशर स्ट्राँग व बडवायझर मॅग्नम या मद्याच्या बाटल्यांसह मारुती ओमनी वाहनाचा समावेश आहे. एकूण २,३०,६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा क्रमांक १५२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सहदेव चंद्रकांत साबळे यांनी फिर्याद दिली असून, आरोपीस BNSS 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

सदर कारवाई स.पो.नि. दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोहवा एन. ए. लोखंडे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास एएसआय चंद्रहार खाडे करत आहेत.

दहिवडी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू केलेली ही सलग मोहीम कायम राहिल्यास गावोगावी सुरू असलेल्या बेकायदा धंद्यांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *