म्हसवड पोलिसांची धडक कारवाई; कर्णकर्कश आवाजाच्या बुलेटसह ४० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड प्रतिनिधी |

म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष नाकाबंदी मोहीम राबवून पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ४० वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत तब्बल २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या आदेशानुसार ही विशेष नाकाबंदी करण्यात आली होती. मोहिमेदरम्यान दारू पिऊन वाहन चालविणारे, भरधाव वेगाने वाहन चालविणारे, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, विना हेल्मेट, काळ्या काचा तसेच कर्णकर्कश आवाज करणारे सायलन्सर बसविलेल्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

विशेष म्हणजे, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलन्सरचा वापर करणाऱ्या तीन बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करत त्यांचे सायलन्सर काढून घेण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होत असून नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

सदर मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी स्वतः उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्यासमवेत पोपट चव्हाण, रणजित खाडे, महावीर कोकरे, श्रीकांत सुद्रीक, युवराज खाडे आणि वसीम मुलाणी यांनी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली.

यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण यांनी सांगितले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *