धुळदेवमध्ये प्रेरणेचा उत्सव; ‘माणदेश रत्न’ पुरस्कारांनी वाढवली यात्रेची शोभा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

धुळदेव (ता. माण) :प्रतिनिधी 

श्री धुळोबा यात्रेनिमित्त धुळदेव गावातील सुशिक्षित व जागरूक तरुणांनी एकत्र येत “धुळोबा नॉलेज फाउंडेशन”ची स्थापना करून माण तालुक्यातील कर्तुत्ववानांचा ‘माणदेश रत्न’ पुरस्काराने गौरव केला. पारंपरिक यात्रेला यंदा प्रेरणादायी आणि शैक्षणिक रंग चढल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या सोहळ्यात माण तालुक्यातील नवनियुक्त पीएसआय अधिकारी, धुळदेव गावातील शासकीय सेवेतील अधिकारी, गावातील शाळेतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच तालुक्यातील पत्रकारांचा ‘माणदेश रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला आयकर आयुक्त मुंबई डॉ. सचिन मोटे, आयकर आयुक्त पुणे नितीन वाघमोडे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप गोरड तसेच साहित्य क्षेत्रातील मानदेशातील मानाचे नाव कथाकथनकार नागू विरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचे ढोल-ताशांच्या गजरात व सनईच्या सुरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री धुळोबा मंदिरात देवदर्शनाने झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सादर झालेल्या धनगरी नृत्याने वातावरण भारावून गेले. यात्रेतील भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांच्यासोबत कर्तुत्वाचा सन्मान करणारा हा उपक्रम विशेष ठरला.

यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रदीप गोरड यांनी मनोगत व्यक्त करत तरुणांनी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. आयकर आयुक्त नितीन वाघमोडे व डॉ. सचिन मोटे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित करत, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा शब्द दिला. तसेच “धुळोबा नॉलेज फाउंडेशन”च्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला धुळोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, तसेच धुळदेव गावातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री धुळोबा देवाच्या गाण्याचे लोकार्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

धुळदेव गावात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रेरणादायी आणि शैक्षणिक उपक्रम पार पडल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात गावात वाचनालय सुरू करणे, विविध प्रेरणादायी उपक्रम राबवणे आणि अधिकाधिक युवक-युवतींना शासकीय सेवेकडे वळवणे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे धुळोबा नॉलेज फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *