उंब्रज–चरेगाव रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी; दुर्गंधीने नागरिक हैराण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते | उंब्रज प्रतिनिधी

उंब्रज : हायवेवरील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या बाजारपेठेसाठी ओळखले जाणारे उंब्रज शहर सध्या अस्वच्छतेच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे. उंब्रज–चरेगाव मार्गावर ड्रेनेजचे पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र चरेगाव रोडवरील एका शाळेसमोर गटारातील पाणी बाहेर येऊन रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी थेट MSEB गेटपर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे या परिसरात एक मोठे रुग्णालय तसेच दाट नागरी वस्ती आहे. त्यामुळे या दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांना दररोज या रस्त्यावरून जाताना नाक दाबून जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रसारमाध्यमांनी वारंवार याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवस तात्पुरती साफसफाई केली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याशिवाय, काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला ओला व सुका कचरा टाकला जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे प्रशासनासोबत नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, जाणीवपूर्वक ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.


 चौकट

ड्रेनेजचा स्रोत शोधून कारवाईची मागणी

सदर ड्रेनेज नेमके कुठून येत आहे याची तातडीने शहानिशा करून संबंधित विभाग व आरोग्य विभागाने संयुक्त चौकशी करावी, तसेच रस्त्यावर ड्रेनेज सोडणाऱ्या जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

कचरा गाडीतच टाका” – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

रस्त्याच्या आजूबाजूला कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा गाडीतच टाकावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *