म्हसवडमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिर; “एक पाऊल कॅन्सरमुक्त म्हसवडकडे” उपक्रम

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड येथे “एक पाऊल कॅन्सरमुक्त म्हसवडकडे” या उपक्रमांतर्गत सर्वज्ञ सेवा संस्था आणि नाशिक येथील मुक्ता कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी मोफत कॅन्सर जनजागृती व तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धनाथ मंदिराजवळील जोगेश्वरी हॉल येथे सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिराच्या आयोजनात सर्वज्ञ सेवा संस्था म्हसवडचे अध्यक्ष नितीनकुमार तिवाटणे यांची प्रमुख भूमिका असून, इंडियन मेडिकल असोसिएशन व म्हसवड मेडिकल असोसिएशन यांचे सहकार्य लाभत आहे. नाशिक येथील मुक्ता कॅन्सर क्लिनिकचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे हे शिबिरात उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत व आवश्यक तपासण्या करून पुढील उपचाराबाबत सल्ला देणार आहेत.

कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर वेळेवर निदान आणि योग्य उपचाराचे महत्त्व लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शरीरावर गाठ येणे, अचानक वजन कमी होणे, सतत खोकला, जखम न भरणे, असामान्य रक्तस्त्राव किंवा वारंवार ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी शिबिरात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नितीनकुमार तिवाटणे यांनी केले आहे.

ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *