म्हसवडजवळ भीषण अपघात : दोन ठार, तीन गंभीर जखमी
म्हसवड |
माण तालुक्यातील म्हसवड शहरालगत धुळदेव गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सातारा येथील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब देवदर्शनासाठी पंढरपूरकडे चारचाकी वाहनाने निघाले होते. सकाळी ९ नंतर म्हसवडहून पुढे जात असताना धुळदेव गावच्या हद्दीत रस्ता उखडलेला असल्याने चालकाचा अंदाज चुकला. अचानक ब्रेक लावल्याने आल्टो कारने तीन ते चार पलट्या घेतल्या आणि भीषण अपघात घडला.
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच धुळदेव गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून मदत करण्यात आली.
दरम्यान, माहिती मिळताच म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचारी अभिजीत भादुले, लुबाळ आणि हांगे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून म्हसवड येथील संचित रुग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी साताऱ्यात हलविण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

