रामनामाच्या गजरात म्हसवड दुमदुमले; देशमाने परिवाराकडून भक्ती व सेवाभावाचा अनोखा संगम
म्हसवड, दि. ६ (प्रतिनिधी)
रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त म्हसवड शहरात भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शहरभर “जय श्रीराम” च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले असताना, देशमाने परिवाराच्या निवासस्थानी आयोजित धार्मिक कार्यक्रमांनी विशेष लक्ष वेधून घेतले.
सिद्धनाथ मंदिरासमोरील देशमाने कुटुंबाच्या घरी असलेल्या ऐतिहासिक पाषाणमूर्तीच्या दर्शनासाठी यंदाही भाविकांनी मोठी गर्दी केली. सुमारे १४व्या शतकातील काळ्या पाषाणातील प्रभू श्रीरामाची ही मूर्ती असल्याने तिचा धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व विशेष आहे. शशीकिरण, डॉ. सचिन आणि अमोल देशमाने या तिघा भावंडांनी या मूर्तीची जतनपूर्वक पूजा-अर्चा करत परंपरा जपली आहे.
रामनवमी निमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. मंदिरात आकर्षक पाळणा उभारण्यात आला होता. दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी पुष्पवृष्टी केली. त्यानंतर महिलांनी पाळणा गीत सादर करत वातावरण भक्तिमय केले. महाआरतीनंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या सोहळ्याला झरे (ता. आटपाडी) येथील संगीत विशारद महादेवीताई पारसे यांच्या सुश्राव्य भजनांनी विशेष रंगत आणली. सरस्वती भजनी मंडळाने त्यांना सुंदर साथ दिली.
विशेष म्हणजे, केवळ धार्मिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता देशमाने परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीही जपली. अनेक भाविकांनी दर्शनाबरोबरच रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भक्ती आणि समाजसेवेचा सुंदर मिलाफ घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये रामनवमी उत्सव यंदा विशेष ठरला.

