कराड नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात जनहिताय फाउंडेशन आक्रमक; अतिक्रमण हटवा अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कराड : कुलदीप मोहिते
शहरातील सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाही कराड नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत जनहिताय फाउंडेशन आक्रमक झाले आहे.
संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब लांडगे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी व लोकनियुक्त नगराध्यक्षांना स्मरणपत्र देत तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या अर्जावर अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. कराड शहरातील अनेक भागांमध्ये फुटपाथवर हातगाडे, स्टॉल, खोकी तसेच दुचाकी वाहनांचा कब्जा वाढला असून नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नसल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषद प्रशासनाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयश आल्याचा थेट आरोप करत, सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे ही स्थानिक प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा धोका निर्माण होत असल्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
“३० दिवसांच्या आत शहरातील सर्व अतिक्रमणे हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले नाहीत, तर दि. २४ एप्रिल २०२६ पासून कराड नगरपरिषद मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा स्मरणपत्रातून देण्यात आला आहे.
या आंदोलनात बापुसाहेब लांडगे, मारुती बोभाटे आणि निवास माने सहभागी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

