मेंढपाळ कुटुंबातील पप्पू ढवळे PSI; माणदेशातील जिद्दीचा विजय
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी
माण तालुक्यातील धुळदेव गावातील मेंढपाळ कुटुंबात वाढलेल्या पप्पू ढवळे यांनी कठीण परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माणदेशातील दुष्काळी परिस्थिती, अंगावर उन्हं-वादळं झेलणारी जीवनशैली आणि मेंढरांच्या ताफ्यात गेलेलं बालपण अशा प्रतिकूल परिस्थितीत पप्पू ढवळे यांचे शिक्षण सुरू होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील डोंगर-दऱ्यात फिरून मेंढरं राखत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर आईने पोटाला चिमटा काढत मुलाच्या शिक्षणाची ज्योत कायम ठेवली.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत त्यांना तीन वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हार न मानता चौथ्या प्रयत्नात यश मिळवत PSI पद पटकावले. धुळदेव गावातून PSI होणारे ते पहिलेच युवक ठरले आहेत.
पप्पू ढवळे यांच्या यशानंतर गावात आनंदाचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी जल्लोषात मिरवणूक काढत साखर वाटप केले. विशेष म्हणजे त्यांच्या आईच्या डोळ्यातील आनंदाश्रूंनी हा क्षण अधिकच भावनिक ठरला.
पप्पू ढवळे यांची ही यशोगाथा माणदेशातील कष्ट, जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्यासाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

