नवोदय प्रवेश परीक्षेत उंब्रज कन्या विद्यालयाचे उज्वल यश; विद्यार्थिनींची दमदार कामगिरी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उंब्रज : प्रतिनिधी (कुलदीप मोहिते)
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गुणवत्तेसह घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेत कु. मधुरिमा विक्रम जाधव हिने ९६.२५ टक्के गुण मिळवून नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित केली. तसेच कु. विधी नितीन दुधाने व कु. ईश्वरी योगेश पवार यांनी प्रत्येकी ९३.७५ टक्के गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. कु. काव्या गणेश साबळे व कु. रुही विनोद पाटील यांनी प्रत्येकी ९१.२५ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यालयातून एकूण ३० विद्यार्थिनी या परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. आर. पाटील मॅडम यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

