सिंहस्थ २०२७साठी ‘कुंभदूत’ : श्रद्धेला तंत्रज्ञानाची नवी दिशा इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये एजेंटिक AI संकल्पनेचे प्रभावी सादरीकरण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

नवी दिल्ली / नाशिक,

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ धार्मिक आस्थेचा महोत्सव न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा जागतिक आदर्श ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत आज नवी दिल्ली येथे मिळाले.
     येथे झालेल्या India AI Impact Summit 2026 मध्ये मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना ‘कुंभदूत’ या अत्याधुनिक एजेंटिक AI आधारित संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वैयक्तिक स्वरूपाचे मार्गदर्शन मिळावे, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे.

     ‘कुंभदूत’ ही संकल्पना “एजेंटिक कुंभ” या मॉडेलवर आधारित असून सिंहस्थ २०२७ मध्ये नोंदणीकृत प्रत्येक भाविकाला स्वतःचा डिजिटल सहाय्यक उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. हा सहाय्यक भाविकाच्या प्रवासाचे नियोजन, निवास व्यवस्था, घाटांची माहिती, पूजा वेळापत्रक, आरोग्य सुविधा, आपत्कालीन मदत, डिजिटल पेमेंट तसेच भाषांतर अशा विविध बाबींमध्ये सातत्याने मार्गदर्शन करणार आहे. भाविकाच्या गरजेनुसार आणि परवानगीनेच हा सहाय्यक विविध सेवा यंत्रणांशी संवाद साधणार आहे.

         एजेंटिक AI म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र डिजिटल एजंट कार्यरत असणे. या प्रणालीत कोणताही केंद्रीकृत डेटाबेस तयार केला जाणार नाही. भाविकांची वैयक्तिक माहिती ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून ती केवळ मर्यादित कालावधीसाठी आणि भाविकाच्या स्पष्ट संमतीनेच वापरली जाणार आहे. शासन, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था किंवा स्थानिक व्यापारी यांच्याशी होणारा संवाद हा नियंत्रणासाठी नसून समन्वयासाठी असेल, यावर आयोजकांनी विशेष भर दिला आहे.

     कुंभदूत AI ही सेवा केवळ स्मार्टफोनपुरती मर्यादित राहणार नाही. स्मार्टफोन नसलेल्या भाविकांसाठी साध्या फीचर फोनवर कॉलद्वारे, IVR प्रणालीच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच किऑस्कच्या माध्यमातूनही माहिती मिळू शकणार आहे. ही प्रणाली वीसपेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये आवाजावर आधारित सेवा देणार असल्याने वयोवृद्ध, अपंग तसेच डिजिटल साक्षरता नसलेल्या भाविकांनाही ती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

    या संकल्पनेत ‘कुंभ पास’ ही ऐच्छिक सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे. हा पास डिजीलॉकरमध्ये सुरक्षित स्वरूपात ठेवला जाणार असून प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे, विविध सेवा सहज मिळवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत भाविकाला तातडीची मदत मिळवून देणे हा त्यामागील उद्देश आहे. संपूर्ण यंत्रणा भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित असेल. यूपीआयद्वारे पेमेंट, डिजीलॉकरचा वापर आणि विविध सार्वजनिक डिजिटल सेवांचा समन्वय या प्रणालीत करण्यात येणार आहे.

    ही प्रणाली सिंहस्थ काळात एक कोटींपर्यंत भाविक आणि लाखो डिजिटल एजंट्स हाताळण्यास सक्षम असणार आहे. सिंहस्थ २०२७ पूर्वी नाशिकमधील विविध महाविद्यालयांमध्ये दहा हजार सहभागींसह पायलट प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यातून या संकल्पनेची कार्यक्षमता प्रत्यक्षात तपासली जाणार आहे.

      यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिंहस्थ २०२७ हा श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम ठरेल. एजेंटिक कुंभ ही संकल्पना महाराष्ट्राला जबाबदार आणि नैतिक AI वापराच्या क्षेत्रात आघाडीवर नेणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले की, इतक्या विशाल आणि शांततापूर्ण धार्मिक सोहळ्याचे नियोजन करताना गोपनीयता जपत अचूक नियोजन करणे आवश्यक असते, आणि एजेंटिक कुंभमुळे ते शक्य होणार आहे. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले की, ही प्रणाली भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसून विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी आहे.

     एकूणच ‘कुंभदूत’ ही संकल्पना सिंहस्थ कुंभमेळ्याला नवी डिजिटल ओळख देणारी ठरणार असून श्रद्धा, सेवा आणि स्मार्ट तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा हा उपक्रम देशासाठी आणि जगासाठीही एक नवा आदर्श निर्माण करेल.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *