शिवडे फाटा (मायाक्का मंदिर) येथील वाहतूक कोंडीवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा उंब्रज पोलीस स्टेशनचे एपीआय पंकज पवार यांना निवेदन — अपघात टाळण्यासाठी तातडीची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उंब्रज (कराड )| प्रतिनिधी :
उंब्रज पोलीस स्टेशनचे नुकतेच पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. पंकज पवार यांना शिवडे फाटा (मायाक्का मंदिर) येथे निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीबाबत पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.हे निवेदन कराड उत्तर तालुकाप्रमुख श्री. संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून, यावेळी एपीआय पवार यांचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कारही करण्यात आला.
मांड नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक शिवडे हद्दीतील सर्व्हिस रोडवरून वळविण्यात आली आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे फाटा (मायाक्का मंदिर) बोगदा परिसरात राज्यमार्ग क्र. १४३ वरून मसूरकडून येणारी वाहने, स्थानिक शेतकरी व जनावरे यांची ये-जा अतिशय धोकादायक ठरत आहे. रस्ता ओलांडताना वारंवार लहान-मोठे अपघात होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवडे फाटा (मायाक्का मंदिर), शिवडे गावाकडे जाणारा रस्ता तसेच ‘हॉटेल आपले गाव’ परिसरात तातडीने मनुष्यबळ नेमण्याची मागणी करण्यात आली.
अन्यथा पुढे कोणताही अपघात झाल्यास संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला असून, शिवसेना व ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा ठाम इशाराही देण्यात आला आहे. याची सर्व जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
यावेळी लक्ष्मण गोंजारे, शंकरराव घार्गे, सर्जेराव भोसले, शिवाजीराव रुपनर, प्रभाकर कमाने, सौरभ शिंदे, राहुल कांबळे, सोन्या कारंडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर आहे; तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल,” असा ठाम सूर उपस्थितांनी व्यक्त केला.

