गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी डिजिटल क्रांतीची हाक – इंद्रजीत देशमुख
व्हिजन २४तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
गावातील गट-तट विसरून आधुनिक डिजिटल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देत विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधावा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी व उत्तम वक्ते इंद्रजीत देशमुख यांनी दिवड (ता. माण) येथे केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड येथे वेदांता फौंडेशन व ग्रामस्थांच्या सहकार्याने साकारलेल्या डिजिटल एआय व स्किल लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे, शिक्षक बँकेचे संचालक विजय बनसोडे, डॉ. चंद्रकांत साबळे, डॉ. सावंत मॅडम, सरपंच अर्चना सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासाहेब काटकर, ग्रामविकास अधिकारी गं. बरे, कोळेकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, मुख्याध्यापक यांनी शाळेच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. सहकारी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध आव्हाने पेलण्यास सक्षम करण्यासाठी गुणवत्ता विकासाची वाटचाल सुरू आहे.
जीवनातील चार प्रकारच्या दानांमध्ये ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे आव्हान स्वीकारून डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून यशस्वी होण्याचे आवाहन केले. मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून त्याचे दुष्परिणाम लक्षात घेणे गरजेचे असून पालकांनी मुलांना योग्य दिशा द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
“ सज्जन, विद्वान, सदभावी महाजन यांना योग्य विचाराची दिशा दिल्यास समाज परिवर्तन घडते. गावाचा विकास साधायचा असेल तर वैचारिक परिवर्तन आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी गावातील प्रशासन, कर्मचारी व ग्रामस्थांनी समन्वयातून राजकारण बाजूला ठेवून ‘ज्ञान मंदिर’ घडवण्याचे आवाहन केले.
Bप्रास्ताविकात मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी शाळेच्या भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी आवश्यक घटकांची माहिती दिली. गावाच्या सहकार्याने डिजिटल विकास साधण्यासाठी विविध संस्थांची मदत घेत शैक्षणिक उन्नती साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी वारली कला, सुडोकू कोडी व गोष्टी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी दिवड शाळेने शैक्षणिक व डिजिटल क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ई-लर्निंग स्टुडिओ, मॉडेल स्कूल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रमांद्वारे तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास शिक्षक हणमंत शेळके, विष्णुदास बिरादार, पांडुरंग सगर, प्रताप आडसर, सुशील त्रिगुणे, बालविकास प्रकल्पाच्या कोळेकर मॅडम तसेच ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवड गावाने डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच ग्रामीण भागातील शैक्षणिक परिवर्तनाची नवी दिशा ठरणार आहे. :- गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे

