प्रजासत्ताक दिनी होणार माजी सैनिक व शहीद जवान कुटुंबीय यांचा सन्मान

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते | कराड

देशभरात २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिक, भारत–पाकिस्तान युद्धात सहभागी झालेले जवान, तसेच देशाच्या सीमेवर शौर्याने लढताना बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा प्रेरणादायी उपक्रम कराड तालुक्यात राबवण्यात येणार आहे.

देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, हायस्कूल व महाविद्यालयांतील प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये विशेष निमंत्रित करून सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी शासन परिपत्रकानुसार करण्यात आली होती. यामागील उद्देश युवक पिढीमध्ये देशप्रेम, सैन्यदलांप्रती आदरभाव वाढवणे तसेच सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे.

यासंदर्भात सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम यांनी दि. १९ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती कराड येथील गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व शिक्षण विभागांना परिपत्रक काढून २६ जानेवारीच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या निर्णयाचे कराड तालुक्यातील माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी स्वागत केले असून, परिपत्रकाची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हा उपक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *