जि.प. व पं.स. निवडणूक व मायाक्का चिंचणी यात्रेचा कालावधी एकाच दिवशी हजारो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि राज्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक असलेली मायाक्का चिंचणी (कर्नाटक) यात्रा यांचा कालावधी एकाच दिवशी आल्याने हजारो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.

   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी मतदान व ७ फेब्रुवारी रोजी निकाल असा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र याच कालावधीत मायाक्का चिंचणी यात्रा सुरू असून ५ फेब्रुवारी हाच यात्रेचा मुख्य दिवस आहे.

या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून, विशेषतः सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतून बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी होतो. कोणतेही कारण असले तरी ही यात्रा न चुकवण्याची भाविकांची परंपरा आहे. त्यामुळे चार–पाच दिवस आधीच धनगर, माळी, मराठा समाजातील भाविक बैलगाडी, मोटारसायकल, खाजगी वाहने तसेच पदयात्रेद्वारे भक्तीभावाने गाणी, ओव्या गात चिंचणी यात्रेसाठी रवाना होतात.

विशेष म्हणजे ५ फेब्रुवारी रोजीच मतदानाचा दिवस आणि यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे हजारो भाविक त्या दिवशी कर्नाटकातच असतात. ६ फेब्रुवारीपासून भाविक परतीच्या प्रवासाला लागतात, त्यामुळे ५ तारखेला मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या परिस्थितीचा फटका सर्वच उमेदवारांना बसणार असून निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त होत आहे. लोकशाहीचा मूलभूत हक्क असलेल्या मतदानापासून नागरिक वंचित राहणे हे योग्य नसल्याचे मत नागरिकांमधून पुढे येत आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोग यांनी लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे. जर मतदानाचा दिवस एक दिवस पुढे ढकलून ६ फेब्रुवारी केला, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार उपस्थित राहून मतदान करू शकतील, असा विश्वास नागरिक व विविध सामाजिक घटक व्यक्त करत आहेत.

लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असताना, धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखत निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. आता या मागणीची दखल घेऊन निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *