मलेशिया आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या साळुंखे बंधूंना पोरे कुटुंबीयांचा मदतीचा हात

बातमी Share करा:

 

म्हसवड – प्रतिनिधी

मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी चैतन्य साळुंखे आणि वेदांत साळुंखे या पैलवान भावंडांची निवड झाली असून, त्यांच्या प्रोत्साहनार्थ पोरे कुटुंबीयांनी मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

मायणी येथील मच्छिंद्र साळुंखे यांचे हे दोन्ही चिरंजीव अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही अथक मेहनत घेऊन पैलवानकीचा छंद जोपासत आहेत. आपल्या छंदासाठी त्यांनी विविध कामे करून सातत्याने सराव सुरू ठेवला. या चिकाटीचे फलित म्हणून त्यांची मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

म्हसवड येथील नासप जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इंजी. सुनील पोरे यांनी या दोन्ही पैलवानांचा शुभम भारत गॅस एजन्सी येथे सत्कार केला. मान्यवरांच्या उपस्थितीत दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करून त्यांनी दोघांना उत्तुंग यशाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला युवा नेते करण भैय्या पोरे, ऍड. शुभम पोरे, बाळासाहेब पिसे, पत्रकार पोपट बनसोडे-पाटील, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, सागर नामदेव, निखिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

पोरे कुटुंबीयांनी केलेल्या या मदतीमुळे साळुंखे भावंडांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मोलाचा हातभार मिळाला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *