म्हसवड येथे राजस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:- प्रतिनिधी
टेनिस क्रिकेट क्षेत्रात राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी ५ वी १९ वर्षाखालील मुले व मुली राजस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा म्हसवड येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांचे आयोजन टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र, टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाच्या महासचिव मिनाक्षी गिरी मॅडम आणि महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दिनांक १७ ते २० डिसेंबर दरम्यान म्हसवड (ता. माण) येथे पार पडणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद लाभत आहे. या अजिंक्यपद स्पर्धेत मुलांचे सुमारे ३० संघ आणि मुलींचे १० संघ सहभागी होणार असून, एकूण सुमारे ४५० खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. याशिवाय स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी २० अधिकृत पंच आणि १५ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धांच्या सुरळीत आयोजनासाठी तीन सुसज्ज मैदानांची तयारी करण्यात आली असून, खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण (YouTube Live) करण्यात येणार असल्याने राज्यभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्यांचा थेट आनंद घेता येणार आहे.

या राजस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सामना पोलीस संघ व पत्रकार संघ यांच्यात रंगणार असून, या अनोख्या सामन्याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आली असून, त्यांना कोणतीही अडचण होऊ नये याची विशेष काळजी आयोजकांनी घेतली आहे.

या भव्य क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी माण तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास सरतापे, सचिव महेश सोनवले, खटाव तालुका अध्यक्ष अ‍ॅड. बाबा शिंदे आणि सचिव विशाल निकम हे विशेष परिश्रम घेत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत आहेत.

राज्यातील नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी देणाऱ्या या राजस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमुळे म्हसवड शहर क्रीडा क्षेत्राच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार असून, या स्पर्धेमुळे टेनिस क्रिकेटला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींमधून व्यक्त केला जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *