म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी — पाच महिने फरार असलेला दहा लाखांचा भामटा आरोपी मुंबईतून अटक
व्हिजन २४ तास न्यूज संपादकअहमद मुल्ला
म्हसवड:-
सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल दहा लाखांची फसवणूक करणारा आणि पाच महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा जोतीराम बालमुकुंद काटकर हा भामटा अखेर म्हसवड पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
फिर्यादी जयवंत राजाराम घाडगे (रा. माळशिरस) यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो अशी बतावणी करून आरोपीने दहा लाख रुपये घेतले होते. मंत्रालयात काम करतो अशी खोटी ओळख देत फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आरोपी यशस्वी झाला होता. मात्र गुन्हा उघड होताच तो फरार झाला आणि सलग पाच महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हता.
या प्रकरणाचा तपास सरळ नव्हता. आरोपी सतत ठिकाणे बदलत होता, नातेवाईक आणि मित्रांकडूनही कोणतीच ठोस माहिती मिळत नव्हती. तरीही म्हसवड पोलिसांनी हार न मानता तांत्रिक तपास, मागोवा, फोन लोकेशन्स यांचा काटेकोर अभ्यास केला. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आरोपी मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात लपून बसल्याची खात्री पटली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने विशेष पथक तयार केले आणि अत्यंत शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने फसवणुकीची कबुलीही दिली.
अटक करण्यात आल्यानंतर आरोपीला म्हसवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस हवालदार देवानंद खाडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी मोलाची भूमिका बजावली.

