म्हसवडच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी सिध्दनाथ नागरिक आघाडीला सत्ता द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनतेला थेट आवाहन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, दि. १
म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वातावरण तापू लागले असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सभेमुळे राजकीय तापमान आणखी वाढले. सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित या विराट जाहीर सभेत दादांनी विकास, प्रशासन, नेतृत्व आणि राजकीय प्रामाणिकपणाच्या मुद्द्यांवर थेट संवाद साधत मोठा जनसमुदाय फुलून गेला होता.

oplus_16

सभेला सुरुवात होताच शहरातील नागरिकांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. व्यासपीठावर माजी मंत्री महादेव जानकर, आमदार उत्तमराव जानकर, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप, प्रा. कविता म्हेत्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने यांच्यासह सिध्दनाथ नागरिक आघाडीचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सभेतील मुख्य भाषणात अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रगतिपंथी परंपरेची उजळणी केली. “शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार अंगीकारूनच महाराष्ट्राने प्रगतीचे नवे शिखर गाठले. लोकशाही म्हणजे रयतेचे राज्य. तेच राज्य म्हसवडमध्ये निर्माण करण्यासाठी सिध्दनाथ नागरिक आघाडीला सत्ता द्या,” असे ते म्हणाले.

“बारामतीप्रमाणे म्हसवडचा विकास मी करुन दाखवतो” — दादा

अजित पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासाचे ठोस आश्वासन. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले —
“आजची सत्ता जर सिध्दनाथ नागरिक आघाडीला दिली, तर बारामतीप्रमाणे म्हसवडचा विकास मी नक्की करुन दाखवतो. माझ्या शब्दाला किंमत आहे. मी बोलतो ते करतो, आणि हे महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे.”

त्यांनी म्हसवड शहराच्या पाणीप्रश्नाकडे विशेष लक्ष वेधले.
“पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची क्षमता या पॅनेलकडे आहे. जिहे–कठापूर, तारळी, उरमोडी, वसना, वंगणा अशा महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांना निधी दिल्यामुळेच माण–खटाव पट्ट्यातील शेती व पाणीस्थिती सुधारली. हाच पॅटर्न म्हसवडमध्ये आणायचा आहे,” असे ते म्हणाले.

“सत्तेची मस्ती करु नका – जनता धडा शिकवेल”

सभेत दादा पवार यांनी विरोधकांच्या कारभारावर थेट टीका करत कठोर इशाराही दिला.
“सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेले नाहीत. दमदाटी, दडपशाही, खोट्या केसेस — हे राजकारण चालू दिले तर जनता कधीच माफ करत नाही. कोणीही सामान्य जनतेला त्रास देऊ नये. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी — आरे-ला का-रे करण्याची ताकद आमच्यातही आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

“धनशक्ती समोर, आमच्याकडे जनशक्ती” — अनिल देसाई

सभेत अनिल देसाई यांनी विरोधकांना थेट लक्ष्य केले.
“म्हसवडचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही, तो राजेमाने कुटुंबाचा आहे, आणि तो कसा वाटला जातोय याचा विचार आता मतदारांनी करावा. नगराध्यक्ष पदासाठी कोट्यवधींच्या बोल्या झाल्या. जी व्यक्ती स्वतःच्या कार्यकर्त्यांना फसवते, ती जनतेला कशी न्याय देणार? आमचे सर्व उमेदवार सामान्य कुटुंबातून आलेले, स्वच्छ छबीचे आहेत. एकीकडे धनशक्ती, तर आमच्याकडे खरी जनशक्ती आहे,” असे ते म्हणाले.

oplus_16

“२० वर्ष सत्तेत असूनही विकास शून्य — हिशेब द्या” — आ. उत्तमराव जानकर

आमदार उत्तमराव जानकर यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांचा थेट समाचार घेतला.
“दोन दशके सत्तेत राहूनही शहराचा चेहरामोहरा बदलला नाही. पाणी, रस्ते, गटार, ड्रेनेज यावर काहीच ठोस काम नाही. उलट विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रकार सुरू आहे. विकासाचे काम शून्य, धमक्या मात्र शंभर टक्के,” असे ते म्हणाले.

तसेच त्यांनी म्हसवड–दहिवडीच्या मधोमध नवीन जेल उभारण्याची उपरोधिक मागणी करत, “येथील सत्ताधारी किती जणांवर खोट्या केसेस लावत आहेत ते बघता, जेलच इथे हवे,” असा टोला लगावला.

“दहशतमुक्त आणि धुळमुक्त म्हसवड आमचे ध्येय” — माजी मंत्री महादेव जानकर

महादेव जानकर यांनी सभेत उत्स्फूर्त भाषण करत विरोधकांना कडक शब्दांत सुनावले.
“आम्ही मटका–दारूवाल्यांना तिकीटे दिलेली नाहीत. लोकांच्या दारात दहशत नेणाऱ्यांना सत्ता मिळू देऊ नका. सिध्दनाथ नागरिक आघाडी हा सामान्यांचा आवाज आहे. भयमुक्त म्हसवडसाठी या आघाडीला एक संधी द्या,” असे त्यांनी आवाहन केले.

त्यांनी भाजपला थेट लक्ष्य करत, “ओबीसी, दलित, मुस्लिम समाजाला भाजपने छळले आहे. गुजरात मॉडेल नव्हे — लोकांना न्याय देणारे मॉडेल म्हसवडमध्ये आणायचे आहे,” असेही सांगितले.

“स्मारके उभारून नव्हे—विचार जगवून विकास होतो” — प्रा. कविता म्हेत्रे

प्रा. कविता म्हेत्रे यांनी समाजप्रबोधनात्मक भाषण करत,
“शाहू, फुले, आंबेडकर यांची स्मारके उभारून विकास होत नाही. त्यांच्या विचारांचा अंगीकार करणारे नेतृत्व आवश्यक आहे. समोरच्या पॅनेलमध्ये बुणगे भरले—इथे फक्त प्रामाणिक मावळे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

“शहराचा निर्णय म्हसवडकर घेतील — बाहेरून आलेल्यांनी नव्हे” — अभयसिंह जगताप

अभयसिंह जगताप यांनी म्हसवडच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला.
“रस्ते, गटार, पाण्यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर २० वर्षे मत मागितलीत. आता म्हसवडचा निर्णय म्हसवडकरच घेणार. उद्योजक निर्माण करायचे असतील तर दूरदृष्टी असलेले नेतृत्व हवे,” असे ते म्हणाले.

“जनतेच्या घरच्या चुली पेटवणारे नेतृत्व द्या” — प्रभाकर देशमुख

प्रभाकर देशमुख म्हणाले,
“समोरच्या पॅनेलचे कारभारामुळे शहराचे वाटोळे झाले. लोकांच्या घरात भांडणे पेटवण्यापेक्षा त्यांच्या चुली पेटवणारे नेतृत्व आवश्यक आहे. आम्ही सामान्यांच्या गल्लीबोळात फिरत आहोत, कारण खरा विकास तिथेच दिसतो,” असे त्यांनी सांगितले.

सभेला प्रचंड प्रतिसाद – म्हसवड विकासासाठी बदलाची हवा

सभास्थळी गर्दी उसळली होती. विविध वाड्या–गल्लीतील नागरिक, महिला, तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भाषणादरम्यान वारंवार टाळ्यांचा कडकडाट, घोषणांचा आवाज आणि पॅनेलच्या समर्थनार्थ करण्यात येणारे जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण निवडणूक जिंकण्याच्या उमेदीने भारलेले होते.

चौकट : “म्हसवड बसस्थानक पूर्ण होण्यामागे अजिनाथ केवटे यांचे आंदोलन” — देशमुख यांचा मोठा खुलासा

सभेच्या शेवटी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी एक महत्त्वाचा दावा केला.
“म्हसवड एस.टी. बसस्थानक पूर्ण झाले, हे काही स्थानिक सत्ताधाऱ्यांमुळे नव्हे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी केलेल्या उपोषणांचे हे फलित आहे. लोकप्रतिनिधी श्रेय घेत असले तरी सत्य वेगळे आहे,” असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *